रशिया- युक्रेन युद्धाबद्दल मुले काय म्हणतात? |
२४ फेब्रुवारी २०२२. चौथीची सर्व मुले मैदानावर खेळत होती. तास संपत आल्यानंतर वर्गात जाण्यासाठी मुलांनी मैदानात ओळ करण्यास सुरुवात केली. मैदानाला लागूनच शाळेच्या भिंतीवर मोठा फळा आहे. त्यावर मुख्याध्यापक जगदाळे सरांनी काहीतरी चिटकवलेले होते. ते नक्की काय आहे अशी कुजबूज मुलांमध्ये सुरू झाली. कागद पाहण्यासाठी फळ्याजवळ गर्दी झाली. वर मथळा होता- रशिया आणि युक्रेन युद्धास सुरुवात. त्याखाली दोन नकाशे चिकटवले होते. जगाच्या नकाशात रशिया आणि युक्रेन कुठे आहेत ते दाखवणारा एक नकाशा आणि युक्रेनमधून जर्मनीकडे जाणारी रशियाची नैसर्गिक वायूची पाइपलाइन दाखवणारा दुसरा नकाशा. रशिया नेमका कुठे आहे, त्याचा विस्तार केवढा आहे, युक्रेन हा देश रशियाच्या तुलनेत किती छोटा आहे यावर तिथेच चर्चा झाली. रशियातर केवढा मोठा देश आहे आणि युक्रेन एवढा छोटासा… तरीही त्या दोघांमध्ये अशा लढाया का? ते एकमेकांना समजून का नाही घेत आहेत? मुलांचे प्रश्न आले.
आम्ही वर्गात गेलो. त्या दिवशीचे वर्तमानपत्र ग्रंथालयातून आणले. त्यातील युक्रेन आणि रशिया यांच्या वादाची बातमी मी मुलांना वाचून दाखवली. भीषण बॉम्बस्फोटांमुळे झालेले सर्वसामान्य लोकांचे हाल, पडलेल्या इमारती, सर्वकाही उध्वस्त झालेले अशी छायाचित्रे वर्तमानपत्रात दिसत होती. ती सर्व मुलांनी बारकाईने पाहिली. आपल्या भारतातील युक्रेनला शिकण्यासाठी गेलेले काही विद्यार्थी तिथे अडकले आहेत आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे हे ऐकताच तर मुले अगदी धीरगंभीर होऊन गेली.
रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाले असतील? छोटे-बडे लोक, स्त्रिया, वृद्ध माणसे यांना किती त्रास सहन करावा लागत आहे, आता गोष्टी महाग होणार का अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
चर्चा झाल्यानंतर मुलांना कागद दिले. युद्धाबद्दलचे त्यांचे मत, भावना चित्रातून आणि लेखनातून व्यक्त करायला सांगितले. कोळसा झालेली झाडे, बेचिराख इमारती, बॉम्ब, लढाऊ विमाने, रणगाडे मुलांच्या चित्रांमध्ये उमटले. कुणी आपल्या शहरावर असे झाले तर काय होईल असा विचार मांडला तर कुणी पशु-पक्ष्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली. काहींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हे युद्ध बंद करावे अशी जोरदार मागणी केली.
आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे वर्गामध्ये येणे फार महत्त्वाचे असते. मुले संवेदनशीलपणे विचार करायला, मत मांडायला शिकतात. प्रियदर्शनी सावंत, शिक्षिका, कमला निंबकर बालभवन |