आमची बालजत्रा |
कोरोना काळात पावणे दोन वर्षे मुले शाळेपासून दूर होती. या काळात ती विविध परिस्थितींमधून गेली. आजारपणे पाहिली, जवळच्या व्यक्तींचे मृत्यू पाहिले, ऑनलाईन तासांमधील नीरसता अनुभवली, अनेकविध कामे केली, आर्थिक अडचण अनुभवली.
त्यामुळे इ. पाचवी ते सातवीच्या मुलांची शाळा सुरू करताना लगेच वर्गात बसून अभ्यास सुरू असे न करता मुलांना थोडे मोकळे होता येईल, शाळेत आल्याचा आनंद होईल अशा प्रकारे त्यांचे स्वागत होणे महत्त्वाचे वाटले म्हणून बालजत्रा भरवण्याचे शाळेने ठरवले.
नववीच्या मुलांनी नियोजनाची जबाबदारी घेतली. आठवीच्या मुलांनी कल्पकतेने पताका बनवल्या. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स मोकळ्या मैदानात लावले होते. त्यामध्ये मुला-मुलींना कृतीशील राहता येईल, विविध गोष्टी करून पाहता येतील अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. मेहंदी है रचनेवाली, इसकी टोपी उसके सर (वर्तमानपत्राच्या टोप्या बनवणे), रंग जादूच्या पेटीतले (मातीच्या पणत्या रंगवणे), आमची माती आमची कला (शाडू मातीच्या विविध कलाकृती बनविणे), फुलवारी (फुला-पानांचे विविध हार व तोरणे बनवणे), रांगोळी काढणे, टॅटू talent (रंगीत पेन वापरून हातावर टाटू काढणे) शब्दांचा, म्हणींचा व वाक्प्रचाराचा डंब शेराज खेळ, नाच बसवणे व करणे, बुकमार्क्स बनवणे, ग्रंथालयाचे विविध उपक्रम अशी खूप मजा मजा होती.
मुलांनी लॉकडाऊनमध्ये काढलेली चित्रे डिस्प्ले केली होती. मुले जाऊन आपापली चित्रे शोधत होती व मित्रमैत्रिणींना दाखवत होती. मुलांनी लॉकडाऊनमध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या हस्तकलाकृतींसाठीही जागा राखीव होती. भारत-पाकिस्तान शांती या विषयावर काढलेली चित्रे व कॅप्शन यांची एक Indo-Pak Peace Gallery होती. प्रयोगशाळेत विज्ञानाचे काही प्रयोग करून पाहायला जागा होती, मुलांनी छोटी विज्ञान खेळणी तयार केली. ताईंनी सर्व मुलांना गोष्ट सांगितली, अभिनय गीत घेतले. संगीतखुर्चीचा खेळ झाला. मुले सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी झाली. सर्वांना एकमेकांना भेटण्याची, शिक्षकांशी बोलण्याची, सोबत विविध उपक्रम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्व मुलांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पूनम वाघमारे |