Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

विचारा 'का?'

अॅक्टिव टीचर्स फोरमच्या व्हॉट्सअॅप गटावर डॉ. सुधीर कुंभार सरांचं काम अनेक दिवस पाहण्यात येत होते. दर आठवड्याला न चुकता ‘निसर्गज्ञान’ हे भित्तीपत्रक यायचेच, तेही सरांनी स्वतः कात्रणे चिकटवून स्वहस्ताक्षरात लिहिलेले अतिशय माहितीपूर्ण व आकर्षक. नंतर समजले की हे आठवडी भित्तीपत्रक सर गेली 22 वर्षे सातत्याने बनवत आहेत!

 

सरांचे दुसरे लक्षवेधी काम म्हणजे जटानिर्मूलन. परवा गटावर त्यांनी केलेल्या १२१ व्या जटामुक्तीचे फोटो पडले आणि वाटले की सरांची आणि मुलांची भेट घालून द्यावीच आता. सर लगेच तयार झाले. सेशनला कमला निंबकर बालभवनचे पाचवी ते दहावीचे साठेक विद्यार्थी आणि काही शिक्षक उपस्थित होते. सरांनी दोन सादरीकरणे केली- एक जटामुक्तीबद्दल, आणि दुसरे ASK WHY (विचारा का). जटा अस्वच्छतेमुळे होतात आणि मग एकदा झाल्या की त्या देवाच्या म्हणून तशाच ठेवल्या जातात. केस अधिक गुंतत जातात आणि स्त्रियांना त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. बऱ्याच मुलांसाठी हा विषय नवा होता हे मुलांनी विचारलेल्या प्रश्नांवरून लक्षात येत होते. उदा. जटा बनायला किती काळ लागतो? जटा कापून टाकल्या तरी पुन्हा होऊ शकतात का?

 

इतर अंधश्रद्धांबद्दलही मुलांचे अनेक प्रश्न होते. नजर लागते का? नसेल तर मग मीठ-चटणी उतरवून का टाकतात? लग्न ठरवताना पत्रिकेचे गुण जुळायला पाहिजेत असे का? पासून ते बर्मुडा ट्रँगलवर जहाज किंवा विमान का जात नाही? पर्यंत अनेक प्रश्नांचे निरसन सरांनी केले. वरदचे म्हणणे होते की त्याला भूत अंगात येण्याचा अनुभव आहे कारण त्याचा ताप उतरत नव्हता तेव्हा एक मांत्रिक बाईने दिलेल्या उताऱ्यामुळे अर्ध्या तासात फरक पडला. सरांनी अजिबात थट्टा न करता व्यवस्थित उत्तर दिले. ते वरदला पटले नाही तेव्हा आणखी उदाहरणे देऊन समजावून सांगितले. सँपल साईजचे महत्त्व विशद केले. भोंदू लोक पेशंटला भेटण्यापूर्वी कशी माहिती काढून ठेवतात ते सांगितले. वीसेकजण सेशन संपल्यानंतरही प्रश्न विचारायला थांबले होते.

 

या संपूर्ण अनुभवासाठी सुधीर सरांचे मन:पूर्वक आभार व त्यांच्या कार्याला शाळेकडून अनेक शुभेच्छा!

 

सेशनचे 3 भागांतील रेकॉर्डिंग पुढील दुव्यांवर पाहाता येईल.

जटानिर्मूलन या विषयावर सादरीकरण https://youtu.be/tnlvfUhhMz4

विचारा ‘का?’ https://youtu.be/s3kGyEWaZko

अंधश्रद्धांबद्दल प्रश्नोत्तरे https://youtu.be/tnlvfUhhMz4


मधुरा राजवंशी, शिक्षिका, कमला निंबकर बालभवन

Previous Reply

Your Reply

*
*