Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

फलटण शहराचे कोविड व्यवस्थापन

दरवर्षी कमला निंबकर बालभवन या शाळेत मुले वार्षिक प्रकल्पावर काम करतात. यावर्षी कोविड-19 हा प्रकल्प विषय ठरल्यानंतर त्यासंदर्भात फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रसाद काटकर यांना मुलांशी संवाद साधण्यासाठी शाळेत बोलावण्यात आले. यावेळी इ. नववी व दहावीचे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते तर पाचवी ते आठवीचे सुमारे 50 विद्यार्थी झूमद्वारे उपस्थित होते.

 

संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करत असताना सर्वच पातळ्यांवर संघर्षातून निर्माणाची भूमिका घ्यावी लागत आहे. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेने बरोबर जनतेचे सहकार्य ही महत्त्वाचे असल्याचे श्री. काटकर म्हणाले.

 

फलटणमधील कोविड परिस्थिती हाताळताना प्रशासकीय पातळीवर नवनवीन उपाययोजनांवर त्यांनी प्रकाश टाकला तसेच शासन-प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

 

त्यांनी सांगितले की कोरोना विषाणू भारतात पसरायच्या आधी फलटणमध्ये नगरपरिषदेने अतिक्रमण मोहीम हाती घेतली होती. पण ती मार्चमध्ये स्थगित करण्यात आली आणि जेव्हा पुणे मुंबई अशा ठिकाणी रुग्ण संख्या वाढायला लागली तेव्हा 23 मार्चला नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली व बाहेरून आलेल्या सर्व लोकांचे विलगीकरण करण्यात आले. बैठकीमध्ये फ्रन्टलाइन कर्मचारी बॅकलाइन कर्मचारी असे वेगवेगळे विभाग करण्यात आले व बाहेरून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यापासून अगदी स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे गट ठरवण्यात आले. हळूहळू टप्प्याटप्प्याने लॉकडाउन करायला सुरुवात केली.

 

फलटण नगरपरिषदेने प्रत्येक घरी वेगवेगळ्या रंगाचे पासेस वाटले. त्या पास वर तारीख टाकण्यात आली व त्या घरातील एकच व्यक्ती चार दिवसांतून एकदा या अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडू शकत होती. ज्या लोकांचे हातावरचे पोट आहे अशांसाठी लॉकडाऊनमध्ये नगरपरिषदेने महाराजा मंगल कार्यालय येथे अन्नछत्र चालू केले. कमिन्सनेही आठ महिने जेवण पुरवले. भाजीपाला, किराणा इ. साठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्वसामान्य लोकांनी हातभार लावला.

 

फलटणमध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर पुढचे 55 दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नाही. नंतर मात्र हळूहळू संख्या वाढू लागली. ऑगस्ट ते सप्टेंबर च्या दरम्यान फलटणमध्ये कोरोनाचा पीक पिरिअड होता. दररोज शहरात साधारणत: 40 ते 50 रुग्ण सापडायचे आणि तालुक्यात शंभर रुग्ण सापडायचे. त्यामुळे कोविड सेंटरमधील ऑक्सिजन बेड कमी पडायला लागले. नगर परिषदेने खाजगी दवाखाने यांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून घेतले. या काळात ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले होते. नोंदणी केल्यानंतर तीन दिवसांनी ऑक्सिजन मिळत होता. मग 12 ऑक्सीजन मशीन्स मिळवून रुग्णांच्या घरोघरी जाऊन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली.

 

लॉकडाऊन मध्ये जे लोक नियमबाह्य वागले त्यांच्याकडून दंड वसूल केला. या काळात नगरपालिकेकडे साधारणत पाच ते साडेपाच लाख रुपये दंड जमा झाला.     

 

सरकारकडून फलटण तालुक्यात कोविड लशीचे दोन हजार पाचशे डोस आले आहेत. आतापर्यंत चारशे लोकांना लस दिली गेली आहे. ही लस टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. पहिल्यांदा डॉक्टर्स, नर्सेस वॉर्डबॉय, मग नगरपालिका कर्मचारी, पोलिस आणि सर्वात शेवटी सर्वसामान्य लोकांना दिले जाणार आहे सध्या 18 वर्षाखालील मुलांना लस दिली जाणार नाही.

 

या अत्यंत नियोजनबद्ध व सूक्ष्म नियोजनामध्ये आशा वर्कर्स पासून ते जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कामाचे श्री काटकर यांनी कौतुक केले. सामान्य नागरिकांनी केलेल्या अमूल्य सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला.

 

विद्यार्थ्यांनी श्री काटकर यांना तुम्हाला भीती वाटत होती का, तुम्हाला कोविड झाला का, प्रसारमाध्यमांचे सहकार्य कसे होते, असे अनेक प्रश्न विचारले. प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉक्टर मंजिरी निमकर यांनी शासकीय यंत्रणेच्या वैद्यकीय सेवा सुविधांच्या सक्षमीकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की शासकीय वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. सक्षमीकरणाला नक्कीच वाव आहे.

 

अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त असे हे सत्र झाले.

संपूर्ण कार्यक्रमाचे 2 भागांत चित्रीकरण पुढील लिंक्सवर पाहता येईल.

 

https://youtu.be/pZbIwFAJYRc

 

https://youtu.be/aODD_qsq0CE


संज्योत उंडे, उपशिक्षिका, कमला निंबकर बालभवन

Previous Reply

Your Reply

*
*