Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

जिव्हाळ्याची गोष्ट खाऊ

खाऊ हा आमच्या शाळेतील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम. शिशुगटापासून ते १० पर्यंतच्या सर्व वर्गातील मुले शिक्षकांच्या मदतीने खाऊचे नियोजन करतात आणि खाऊ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात.

 

शाळेत खाऊ करायचा असला की मुलांना रोजच्या अभ्यासातून थोडा अवकाश मिळतो. वर्गात शिकलेल्या आणि न शिकलेल्याही काही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पूर्वानुभवाशी सांगड घालता येते. पदार्थांची विविधता व त्यामधील पौष्टिकता अभ्यासता येते. छोट्या छोट्या कामातून स्वावलंबी बनण्यास मदत होते. आणि महत्त्वाचे म्हणजे खाऊ बनवायला खूप मजा येते आणि एकदम चविष्ट काहीतरी खायला मिळते! खाऊसाठी आवश्यक गोष्टींची यादी करणे, किमतीचा अंदाज लावून पैसे गोळा करणे, प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू आणणे यापासून ते खाऊ तयार करणे आणि वापरलेली भांडी स्वच्छ धुवून ज्या त्या ठिकाणी ठेवणे इथपर्यंतची सर्व कामे मुले–मुली मिळून करतात. लसूण सोलणे, भाज्या निवडणे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो चिरणे, काकडी, गाजर खिसणे, तांदूळ निवडणे, इत्यादी गोष्टींच्या कामाचा त्यांना अनुभव मिळतो.

 

मोठा खाऊ करताना जेव्हा मुले आपला खाऊ चुलीवर करण्याचा हट्ट धरतात. चुलीवर केलेल्या खाऊची चव काही निराळीच! अहाहा!! चूल करताना विटा किती लागतील? खड्डा किती खांदायचा? पातेल्याला बाहेरून माती का लावायची? लाकडे किती लागतील? याचा विचार मुलांना करावा लागतो.

 

आतापर्यंत रंगबेरंगी कोशिंबीर, गव्हाची खीर, चकोल्या, कडधान्यांची उसळ, साजूक तुपातला शिरा, मसाले भात, पावभाजी, मिसळ पाव, पालकभात, फ्रूटसॅलेड, चटपटीत भेळ, हाक्का नूडल्स, शेझवान राईस, चिकन बिर्याणी असे नाना तऱ्हेचे पदार्थ मुलांनी बनवून खाल्ले आहेत. तसेच थंडीच्या दिवसात कोवळ्या उन्हात बसून पाड्यावरचा असतो तसा गुळाचा गरमागरम चहा पिण्याचा अनुभवही घेतला आहे.

 

सत्रातून एकदा होणाऱ्या मोठ्या खाऊसोबतच दर महिन्याला छोटे छोटे खाऊ होतच असतात. याला वेळ कमी लागतो व वर्गणीही कमी लागते. जास्त काम न करता पटकन होणारा असतो हा छोटा खाऊ. यात उकडलेल्या शेंगा, ओली भेळ, स्वीट कॉर्न चाट इ. बनवता येते.

 

खाऊ बनवण्याच्या प्रक्रियेची विविध विषयांशी जोडणी करता येते. गणित– हिशोब, विज्ञान– जीवनसत्वे, ऊर्जा, मराठी– क्रिया विशेषणे, कोडी, कविता, चित्र, लेखन, इंग्रजी– पदार्थांची व क्रियांची इंग्रजी नावे, हिंदी– नावे, कविता, लेखन, आलेला अनुभव, भूगोल– शेती, कार्यानुभव– टाकाऊ पदार्थांपासून कलाकृती बनवणे. उदा. शेंगांची टरफले वापरून कलाकृती.

 

ही जबाबदारी मुलांना सक्षम बनवते. हे काम मला जमू शकते, ही जाणीव मुलांना समृद्ध करते. कल्पना लढवणे, निर्णय घेणे या क्षमता विकसित होतात. आनंदाने खाऊ खाणे, मग ते घरी असो किंवा शाळेत हे मुलांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यकच आहे. खाऊ करताना आणि खाताना मिळणारा आनंद हेच या उपक्रमाचे खरे फलित आहे.


अरुणा शेवाळे, शिक्षिका, कमला निंबकर बालभवन

Previous Reply

Your Reply

*
*