Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

आपली शाळा, आपले मॉडेल

बालवाडीतील कन्स्ट्रक्शन कॉर्नर

 

विषय:- मॉडेल तयार करणे. 

 

कन्स्ट्रक्शन कॉर्नरमध्ये खेळताना मुले ठोकळ्यांपासून, रिकाम्या खोक्यांपासून तसेच पाईप व एलबोज यांचा वापर करून स्वतःच्या कल्पनाशक्तीने वस्तू बनवतात.

 

मुलांसाठी काही तरी इंटरेस्टिंग व चॅलेंजिंग असावे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा या हेतूने मुलांशी गप्पा मारल्या. आपण आपल्या शाळेचे मॉडेल बनवूया अशी कल्पना समोर आली आणि आम्ही तयारीला लागलो.

 

ताई: आपल्याला आपल्या शाळेचे मॉडेल तयार करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

मुले : काही नाही ताई सोपे आहे. पुठ्ठे, खोकी यांच्यापासून करू की शाळा.

 

ताई : ठीक आहे. आपण खोकी व इतर साहित्य गोळा करूया.

 

दुसऱ्या दिवशी काही मुलांनी रिकामी खोकी, पुठ्ठे आणले. मग आकार पाहून कोणत्या खोक्यापासून कोणता वर्ग कारायचा, खिडक्यांना गज म्हणून काय लावायचे, गेट कशाचे करायचे अशी चर्चा करून दोन दिवसांत सर्व साहित्य जमा केले.         

    

प्रत्यक्ष मॉडेल करायच्या आगोदर वर्गातील मुलांचे दोन गट केले. दोन्ही गटांना घेऊन आम्ही शाळा बघून आलो. शाळा बघून आल्यावर काय काय पाहिले हे मुलांनी सांगितले. मग खोल्या किती आहेत, ऑफिस कुठे आहे, बाथरूम कशाच्या मागे आहे, हात धुण्यासाठी कसे जावे लागते याबद्दल एकमेकांशी गप्पा केल्या. मग खडूने फारशीवर तसे चित्र काढायला सांगितले. त्यामुळे कोणती गोष्ट नेमकी कुठे आहे हे मुलांना समजले.

 

दुसऱ्या दिवशी काही  मुलांनी ठोकळ्यांपासून शाळा बनवली. तर काही मुलांनी कागदावर शाळेचा नकाशा काढला  आणि नकाशा वाचनही करून दाखविले. त्यामुळे डावी बाजू, उजवी बाजू, वर, खाली, पुढे, मागे ह्या संकल्पना स्पष्टपणे मुलांना समजल्या.

 

आता आम्ही प्रत्यक्ष मॉडेल करायला घेतले. कुठल्या वर्गासाठी कुठला बॉक्स वापरायचा? पत्रा कसा लावायचा? दार कसे चिकटवायचे? मुलांचेच प्रश्न आणि त्यातून त्यांनीच मिळवलेली उत्तरे खरेच आश्चर्य वाटण्याजोगी होती.

 

मुलांचे गट करून कामे वाटून घेतली. काही मुलांनी मापे घेऊन कागद कापले तर काहींनी कापलेले कागद योग्य त्या जागेवर चिकटवले. जवळ जवळ 15 दिवसांनी आमचे मॉडेल आकार धरू लागले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता दिसू लागली. त्यांना रोज नवीन काहीतरी सुचायचे. ताई हे राहिले, ते राहिले, थांबा मी करतो. कंटाळा तर कसलाच नव्हता. अतिशय उत्साहात आणि कल्पकतेने मुलांनी मॉडेल पूर्ण केले.

 

साडेपाच वर्षाच्या मुलांना असे मॉडेल बनविणे कठीण जाईल असे मला वाटले होते. पण माझा हा गैरसमज मुलांनी सहज दूर केला. मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते. फक्त आपल्याला तिला योग्य ती दिशा देता आली पाहिजे.


निशा झेंडे, बालवाडी शिक्षिका, आपली शाळा

Previous Reply

Your Reply

*
*