Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

नातं निसर्गाशी

पाचवीच्या वर्गात मी मुलांना म्हणालो “आपण उद्या पासून वर्गात रेडीओ ऐकणार आहे”. मुलांना आश्चर्यवाटले आणि खोटे पण वाटले. दुसऱ्या दिवशी मी वर्गात सेलवर चालणारा रेडीओ आणला. मुलांनी रेडीओ पहिला आणि म्हणाले “सर, मोबाईलच्या जमान्यात रेडीओ ऐकायचा ?”आणि सगळी मुले हसली. पण मला मात्र खात्री होती की मुलांना आवडेल. आपण काय ऐकणार आहोत ते मी त्यांना सांगितले. आकाशवाणी पुणे केंद्रावरून दररोज दुपारी २ वाजता नातं निसर्गाशी हा कार्यक्रम प्रसारित होतो.नातं निसर्गाशी हा कार्यक्रम आणि पाचवीचे पाठपुस्तक – परिसर अभ्यास यामध्ये बरेच घटक एकमेकांशी संबंधित आहेत.या कार्यक्रमामध्ये निसर्गातील अनेक गोष्टींबद्दल बोलले जाते. उदा. प्राणी, पक्षी, वनस्पती, जगातील समुद्र आणि समुद्र किनारे, पक्ष्यांचे स्थलांतर, इंद्रधनुष्य, परिसंस्था, अन्नसाखळी, खनिजे इत्यादी. तज्ञ लेखक ही माहिती सांगतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर रेडीओ ऐकण्याची सवय नसल्याने मुले एकमेकांकडे बघायला लागली. पण थोड्या वेळाने रेडीओवरील सादरकर्त्याचा आवाज, विषयाची खोली आणि रंजक नवी माहिती ऐकल्यावर मुलांना रेडीओ ऐकण्याची गोडी लागली. काही मुलांनी न सांगताच ऐकताना नोट्स काढायला सुरुवात केली. काही मुलांनी तर एक छोटी वहीच केली. आणि त्यावर लिहलं “नातं निसर्गाशी” मुलांनी कार्यक्रमाच्या लेखकास पत्रेही लिहिली.

 

आता पुढे कसे न्यायचे याचा विचार माझ्या मनात आला. तेवढ्यात वर्गातील क मुलगा म्हणाला “सर, याच विषयाची माहिती आपण गुगल वर शोधूया का ?” बऱ्याच वेळी विद्यार्थीच शिक्षकांचे गुरु बनतात. अगदी तसेच झाले. आमचा ताफा संगणक कक्षाकडे निघाला. रेडीओवर ऐकलेली माहिती, चित्रे, व्हिडीओ मुले संगणकावर बघू लागली. मिळवलेल्या माहितीचे वर्गीकरण केले. मुलांपैकी एक उत्साही मुलगी म्हणाली “सर, आपण सर्वांनी यातील एकेका विषयावर प्रकल्प करूयात का ?” मी हो चालेल म्हणालो. आणि मुले प्रकल्प करण्यात गुंतून गेली. त्यांनी ग्रंथालयातील पुस्तके शोधली व वाचली. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. आणि अगदी तसेच झाले. काही मुलांनी तर PPT तयार केली आणि प्रार्थनेच्या वेळी ती सादर केली. हा उपक्रम मी इयत्ता ५ वीच्या वर्गासाठी करत आहे पण, विज्ञान शिकविणारया सर्व शिक्षकांसाठी याचा उपयोग निश्चितच होईल.

 

अशा प्रकारे रेडीओ ऐकण्यापासून सुरु झालेला हा प्रवास आधुनिक काळातील पॉवर पोईंट प्रेझेन्टेशन पर्यंत जाऊन पोहचला. रोज वर्गात गेल्यावर मुले दोन बोटे वर करून म्हणतात “दोन वाजले की सर, नातं निसर्गाशी लावाकी” मुलांनी हात वर करून दाखवलेली ही दोन बोटे ही मला या उपक्रमाची Victory च वाटते.

 


अनंत महामुनी, शिक्षक

Previous Reply

Your Reply

*
*